फकिराचे तत्वज्ञान – प्रा. डॉ. भगवान वाघमारे
₹51.00
लहू, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांप्रति एकनिष्ठ आणि समग्र असलेले सुप्रसिद्ध विचारवंत आणि पुरोगामी चळवळीचे भाष्यकार प्रोफेसर भगवान वाघमारे सर. खऱ्या अर्थाने वनस्पतिशास्त्र या विषयाचे वैज्ञानिक म्हणून ते सुपरिचित असतानाच त्यांच्या आत्तापर्यंतच्या वैचारिक परंपरेला लेखनाकृत करण्याचा मनोदय आम्ही दयाधन पब्लिशर्स ग्रुपच्यावतीने त्यांच्याशी बोलून संकल्पित केला. सरांनी अवघ्या काही क्षणात विचार लेखन परंपरेस सानंद स्वीकृत केले.
अण्णाभाऊ साठे हे विद्रोही, सामाजिक न्यायाचे प्रणेते, जन माणसाचे आत्मभान असणाऱ्या नायकांना प्रेरित आणि लेखांकित करणारे थोर सत्यशोधकी विचारवंत व साहित्यिक आहेत. अण्णाभाऊ साठे त्यांच्या समग्र वांङमयातील प्रमुख ‘फकीरा’ ही एक कादंबरी आहे. या कादंबरीच्या माध्यमातून जोगणीचा ताबा मिळवण्याचा संघर्ष आणि लढा हा केवळ यात्रा अथवा जत्रा महोत्सव इथपर्यंतच मर्यादित न राहता या प्रक्रियेचे वैचारिक आणि प्रबोधकीय चिंतन होणे अत्यावश्यक आहे. फकिरा नायक म्हणून या कादंबरीतील मुख्य केंद्रित असलेले पात्र आहे. या पात्रास तथाकथित मंडळींनी विस्तारित, व्यापक, सामाजिक सलोखा राखणारे न लिहिता ते कलुषित आणि विध्वंसक स्वरूपात मांडून फकिराच्या कर्तुत्वाचे विडंबन मांडलेले आहे परंतु फकिरा हा सामाजिक न्यायाचा प्रणेता असलेला, दानत असलेला, जाणता नायक आहे. हे मांडण्याचे प्रमुख काम या लघु पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हाती सुपूर्द करताना मला मनस्वी आनंद होत आहे.
सत्यशोधकी व सत्यवर्तनी विचार परंपरेतील बहुआयामी तत्त्वज्ञान प्रोफेसर भगवान वाघमारे सर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आपणा सर्वांच्या हाती लवकरच स्थिरावणार आहे या अशावादासह आपण सर्व या लघु पुस्तिकेचे मनःपूर्वक स्वागत कराल हीच आशा बाळगतो.
फकिरा हा वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित, शोषित, श्रमिक, कष्टकरी आणि पोटाची व बोटांची गाठ भेट न होणाऱ्या समूहासाठी स्वाभिमानी पोशिंदा आहे. हे प्रत्येक प्रसंगागणिक वाचकांच्या निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. प्रस्तुत लेखनात आदरणीय वाघमारे सरांनी उपस्थित केलेले ऐतिहासिक दाखले, प्रसंग, सामाजिक न्याय, नैतिकता, बंड, विद्रोह, आणि मानवी जाणिवांचे अलौकिक शब्दामृत या पुस्तिकेचे वाचन करताना आपल्या प्रत्ययास आल्याखेरीज राहणार नाही. याचाही त्रिवार विश्वास वाटतो.
अण्णा भाऊंच्या झुंजार लेखणीला आणि फकिराच्या क्रांतिकारकत्वाला विनम्र क्रांतिकारी अभिवादन !
डॉ. दयाराम द. मस्के
कार्यकारी संचालक, दयाधन पब्लिशर्स ग्रुप, हिंगोली
Reviews
There are no reviews yet.